मुंबई : राज्यातील उच्च ‘शिक्षण आणि संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक सुलभतेने शिक्षण मिळावे तसेच त्यांना उद्योगआधारित शिक्षणाची सांगड घालता यावी, यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद अर्थात महासार्कची स्थापना केली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.
डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपला अहवाल दिला असून या अहवालातील शिफारशींनुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील तरतुदींची राज्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या अनुषंगाने उच्च शिक्षण, संशोधन व नवोपक्रम या क्षेत्रातील उत्कृष्टता अधिक बळकट करण्यासाठी व त्यास पुढे नेण्यासाठी राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील संकल्पना, विचारसरणी, चिंतनप्रक्रिया आणि तर्कशास्त्र यांची व्यापक स्वरूपात देवाणघेवाण घडवून आणण्यासाठी व मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद अर्थात महासार्कची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे.