पुणे : मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या सर्व भाषा एकसमान असून यापैकी कोणतीच भाषा कोणत्याही प्रकारचे वितुष्ट निर्माण करत नाही. भाषा ही केवळ माणसाला एकमेकांशी जोडण्याचे काम करते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
एमसीई सोसायटीच्या ‘स्पोकन मराठी अकादमी’ यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या सांगता समारोह प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन सोसायटीच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार, सचिव इरफान शेख, शिक्षण संचालक महेश पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, मराठी भाषेमध्ये प्रत्येकाचं धर्माच्या साहित्यिकांनी योगदान दिले आहे. कुठलाही खरा धर्म द्वेषाची भाषा बोलत नाही. त्यामुळे भाषा आणि धर्म हे लोकांना एकत्र आणण्यासाठी महत्वाचे घटक आहेत, असे सबनीस म्हणाले.
डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. ए. इनामदार म्हणाले, संस्कृत भाषेतून इतर सगळ्या भाषांचा विकास झाला आहे. परंतु प्रांतीय भाषा आता लोप पावत चालल्या असून इंग्रजीचे प्रभाव वाढत आहे. इंग्रजी गरजेची असली तरी आपली मातृभाषा मराठी टिकवून ठेवणे, हे आपले कर्तव्य आहे, असे डॉ. इनामदार यांनी सांगितले.
गझल संशोधक डॉ. अविनाश सांगोलेकर व गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या दरम्यान मराठी गझल गीतांची जुगलबंदी झाली. या जुगलबंदीला विद्यार्थी, शिक्षक व उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नूरजहाँ शेख, सूत्रसंचालन दिलशाद शेख यांनी तर आभार प्रदर्शन निलोफर पटेल यांनी केले.
पंधरवड्याच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन…!
स्पोकन मराठी अकादमीच्या वतीने १९ ते ३१ जानेवारी दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रीयन खेळ, बडबडगीत स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, आनंद मेळावा, चिकणमाती स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, क्षेत्रभेट व महाराष्ट्राची लोकधारा या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला, अशी माहिती स्पोकन मराठी अकादमीच्या संचालिका डॉ. नूरजहाँ शेख यांनी दिली.