-संतोष पवार
पळसदेव : सध्या मुलांना शिक्षण देण्यासाठी पालकांचा ओढा हा सीबीएससी बोर्डाच्या शाळांकडे आहे. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा ओस पडत चालल्या आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुढील काळात शिक्षण मंडळांच्या शाळामध्ये CBSE पॅटर्न राबवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
आपल्या मुलांना सीबीएससी बोर्डाच्या शाळांमध्ये घालावे आणि चांगले शिक्षण द्यावे. यासाठी लोक सीबीएससी बोर्डांमध्ये त्यांच्या मुलांना टाकतात. परंतु, आता राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये देखील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, स्पर्धा परीक्षांमध्ये मुले मागे पडू नये. यासाठी राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएससी अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत अभ्यासक्रम देखील निश्चित करण्यात आलेला आहे. आणि पुढील वर्षापासून राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये हा सीबीएससी पॅटर्नचा अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. याबद्दलची माहिती दीपक केसरकर यांनी दिली.
सीबीएससी पॅटर्न असला तरी अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय अनिवार्य करण्यात येणार आहे, असे देखील सांगण्यात आले आहे. या आधी अकरावी बारावीला मराठी या विषयाला पर्यायी दुसरा विषय घेता येत होता. परंतु आता सगळ्यांना अकरावी आणि बारावीला मराठी हा विषय अनिर्वाय असणार आहे. नुकतेच झालेल्या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळवण्याबद्दल एक आराखडा तयार केला असल्याचे सांगितले आहे. सीबीएससी शाळांचे वेळापत्रक आणि सुट्ट्या वेगळ्या असतात. त्यामुळे आता त्या शाळाप्रमाणे बदल करण्यासाठी शिक्षक संघटनांची चर्चा करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले .