मुंबई : दहावी-बारावी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा उल्लेख करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला असून आता नव्याने हॉल तिकीट दिले जाणार आहे. हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा उल्लेख असल्याचे उघड झाल्यावर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर शिक्षण मंडळाने
सारवासारव केली. आता मात्र हा निर्णयच मागे घेत शिक्षण मंडळाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. शिक्षण तज्ज्ञ आणि शिक्षकांकडून बोर्डाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. हा वाद वाढल्यावर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय मागे घेतला आहे.
विद्यार्थ्यांना नवे हॉल तिकीट
दहावी-बारावीच्या हॉल तिकिटांवर असलेला ‘जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख आता काढण्यात आला आहे. सोमवारपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना नवीन हॉल तिकीट उपलब्ध झाले आहेत. राज्यात ११ फेब्रुवारीपासून बारावीची, तर २१ फेब्रुवारीपासून दहावी बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने हॉल तिकीट ऑनलाईन डाऊनलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांना आता नवीन हॉल तिकीट उपलब्ध होतील.