पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के राखीव जागांच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. न्यायालयाने आरटीई प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे. हा निकाल पुढील आठवड्यात लागणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पालकांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आरटीई प्रवेशाच्या विविध याचिकांवर न्यायालयात गुरुवारी (११ जुलै) सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने निकाल राखून ठेवला. हा निकाल पुढील आठवड्यात लागणार आहे. आरटीई प्रवेशासाठीची सोडत काढून महिना उलटला, तरी विद्यार्थ्यांना शाळा देण्यात आल्या नाहीत. राज्य शासनाने आरटीई कायद्यात बदल केल्याने यापूर्वीच प्रवेशप्रक्रिया रखडली होती. त्यामुळे जुन्या पद्धतीनुसार प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली. या कालावधीत काही खासगी शाळांनी आरटीईच्या जागांवर प्रवेश दिले. तसेच न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केल्या. या सर्व प्रकरणात दिरंगाई होत असल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जवळपास दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून ही प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. तसेच ऑगस्टपर्यंत आरटीईच्या विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू होतील, अशी शक्यता आहे.