पुणे : शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या या विषयावरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. आपल्या हवे असेल ते ठिकाण मिळविण्यासाठी काही शिक्षक राजकीय दबाब आणतात, यावरुन प्रशासनात वाद निर्माण झाले आहेत. अवघड ठिकाणी शिक्षक जाण्यास नापसंती दाखवतात. आता दोन-तीन दिवसात या बदल्या होणार आहेत.
मागील तीन वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या नव्हत्या. त्यातच राज्य सरकारने शिक्षकांच्या बदल्यांचे जुने धोरण रद्द करुन गेल्या वर्षी नवे बदली धोरण जाहीर केले होते. नव्या धोरणानुसार अॉनलाइन बदल्या करण्यासाठी खास मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे.
राज्य सरकारने गुरूवारी (ता.२०) या बदल्यांसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या या दिवाळीनंतर केल्या जाणार आहेत. यानुसार पुणे जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळांची यादी येत्या दोन दिवसांत जाहीर केली जाणार आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने गुरवारी (ता.२०) सर्व जिल्हा परिषदांना शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे सविस्तर वेळापत्रक पाठवले असून, या वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया राबविण्याचा आदेश दिला आहे.