युनूस तांबोळी
शिरूर : बिबट्या आला रे…फटाके वाजवा रे…म्हणत कुठे तरी बिबट्याने मनुष्य किंवा पाळीव प्राण्याला भक्ष केल्याचे वृत्त समोर येते. बिबट्या अन त्याचे हल्ले हा एक भीतीदायक प्रसंग सध्या विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांमध्ये आहे. मात्र यावर उपाय म्हणून जांबूत ( ता. शिरूर ) येथील जय मल्हार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोग सादर केला आहे.
या प्रयोगातून रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करणारे चोरटे, जंगली प्राण्यांची सुचना अलार्मने आगाऊ मिळणार आहे. विज्ञान प्रदर्शनात त्यांनी सादर केलेल्या या प्रयोगाची चांगलीच चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे.
जांबूत ( ता. शिरूर ) येथील जय मल्हार हायस्कूल मध्ये नुकतेच आठवडे बाजार व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच दत्तात्रेय जोरी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक एस. बी. फिरोदिया, माजी मुख्याध्यापक आर. एस. कापसे, पर्यवेक्षक झुंबर गाजरे, डॉ. खंडू फलके, बाळासाहेब पठारे, बाळासाहेब बदर, योगेश जोरी, बाळासाहेब फिरोदिया, बाळकृष्ण कड, पोपट फिरोदिया, कारभारी थोरात, गोरक्ष गाजरे, राणी बोर्हाडे, सुनीता राउत, जयसिंग जगताप, बाबा फिरोदिया, बबन गाजरे, सिताराम म्हस्के आदी शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना व्यवहारीक ज्ञान प्राप्त व्हावे यातून त्यांना चलनातील व्यवहार कळावे या उद्देशाने हा आठवडे बाजार भरविण्यात आला होता. त्यातून ग्रामस्थांनी घेतलेला पुढाकार महत्वाचा असल्याचे सरपंच जोरी यांनी सांगितले.
या आठवडे बाजारात कमी किंमतीत ताजा भाजीपाला मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. जवळपास २५ हजार रूपयांची उलाढाल यातून झाल्याचे मु्ख्याध्यापक फिरोदिया यांनी सांगितले.
बिबट्याचे हल्ले हा या भागातील ज्वलंत प्रश्न झाला आहे. त्यातून घराभोवती संरक्षण म्हणून रात्रीच्या वेळी चोरटे किंवा जंगली प्राणी घुसल्यास अलार्मचा आवाज होईल व त्याची सुचना त्या कुटूंबास होईल. असा प्रयोग तयार करण्यात आला आहे.
हा प्रयोग कमी खर्चातील असून शेतकऱ्यांनी या प्रयोगाचा वापर शेतात व घराभोवती करावा. त्यातून शेतमालाची चोरी व बिबट्याचे हल्ल्यांपासून बचाव करता येईल. शिवाय हा कमी खर्चातील प्रयोग असल्याचे येथील विद्यार्थ्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल जाधाव यांनी केले तर आभार रमेश अर्जून यांनी मानले.