-संतोष पवार
पळसदेव (पुणे) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या 9 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. शिष्यवृत्ती अर्ज https://2025.puppssmsce.in/ या संकेतस्थळावर जाऊन भरता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा अर्थात इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता येत्या 9 फेब्रुवारी रोजी आयोजित केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना 17 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. तर विलंब शुल्कासह 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत विद्यार्थी परीक्षा अर्ज भरू शकतील. अति विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत 16 डिसेंबर ते 23 डिसेंबर आहे.
त्याचप्रमाणे अति विशेष विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर अशी असेल. इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क 50 रुपये व परीक्षा शुल्क 150 रुपये आहे.