मुंबई: पवित्र पोर्टल प्रणाली लागू केल्यापासून राज्यात आतापर्यंत 18 हजार 800 शिक्षकांची पदभरती झाली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य किशोर दराडे यांनी शिक्षक भरती आणि शिक्षकेत्तर पदांची भरती याबाबत सभागृहात अर्ध्या तासाच्या चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री भुसे बोलत होते.
सन 2011 मध्ये पटसंख्येबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पटसंख्येची पडताळणी केल्यानंतर त्यामध्ये तथ्य आढळल्याचे सांगून मंत्री भुसे म्हणाले की, त्यानंतर राज्यात शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर विज्ञान, गणित आणि इंग्रजी विषयांच्या शिक्षक भरतीसाठी विषेश मोहिम राबवण्यात आली आणि 2016 मध्ये भरतीवरील बंदी उठवण्यात आली. तसेच 2017 मध्ये शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलची निर्मिती करण्यात आली. तसेच शिक्षक भरतीसाठी कमाल वयोमर्यादेची अट ही फक्त प्राथमिक शाळांसाठी असून माध्यमिक शाळांसाठी अशी कोणतीही अट नाही. शिक्षकांची पदे पटसंख्येवर अवलंबून असल्याने संच मान्यतेची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. संच मान्यतेची प्रक्रिया प्रगतीपथावर असून राज्यात 10 हजार 940 रिक्त शिक्षक पदांची मागणी पवित्र पोर्टलवर नोंदवण्यात आली आहे. यापेकी 80 टक्के पदे भरण्यास मान्यता देण्यात आली असून शिपाई हे पद कायमतत्वावर भरता येणार नसल्याचेही शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी सांगितले.