पुणे : दरवर्षी दिवाळीपर्यंत सुरू राहणारी इयत्ता अकरावीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया यंदा १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. ११ ऑगस्टपासून कनिष्ठ महाविद्यालयांचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील जवळपास ११ हजार ७०० कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या सुमारे १६ लाख ७६ हजार जागा उपलब्ध होणार असून, या माध्यमातून अकरावीच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर लक्ष राहणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी दिली. याप्रसंगी शिक्षण सहसंचालक श्रीराम पानझडे उपस्थित होते.
राज्यात आतापर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नागपूर, नाशिक आणि अमरावती महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवली जात होती. त्याअंतर्गत सुमारे एक हजार ७३० महाविद्यालयांतील सुमारे सव्वा सहा लाख जागांवर साडे चार लाख विद्यार्थी प्रवेश घेत होते. आता संपूर्ण राज्यभरात केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.
केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना एका अर्जातच राज्यभरातील महाविद्यालयांतील प्रवेशाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या देखरेखीखाली जिल्ह्यातील प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्याथ्यांच्या मार्गदर्शनासाठी प्रत्येक महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती सूर्यवंशी यांनी दिली.