पुणे : अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या दुसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले असून, ३ जुलैपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. ३ ते ६ जुलै या कालावधीत पसंतीक्रम नोंदवणे, नवीन विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी करून अर्ज भाग २ भरून तो प्रमाणित करून घेऊ शकतात. तसेच विद्यार्थ्यांना त्यांचा अर्ज भाग १ मध्ये दुरुस्ती करता येईल.
अकरावीच्या पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून प्रवेश निश्चितीसाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. दुसऱ्या नियमित फेरीला ३ जुलैपासून सुरुवात होत आहे. १० जुलै रोजी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार असून १२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करायचा आहे. यानंतर रिक्त जागेनुसार तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.
महाविद्यालयांची तपासणी
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये झालेल्या प्रवेशांची शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाणार आहे. तसेच प्रवेशप्रक्रियेचे संपूर्ण ऑडिट केले जाणार आहे. अकरावीला प्रवेश घेऊन महाविद्यालयात न फिरकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने कठोर पाऊल उचलले आहे. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयातील उपस्थितीचे गांभीर्य बाळगतील, अशी अपेक्षा’ व्यक्त केली जात आहे.