पुणे : राज्य मंडळ वगळता इतर मंडळांच्या लांबलेल्या दहावीच्या निकालाचाही अकरावी प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला होता. आता ही प्रतीक्षा संपली आहे. येत्या शुक्रवारपासून विद्यार्थी पसंतीचे एक ते दहा महाविद्यालये निवडू शकतात.
ज्या ग्रामीण भागात विद्यालय स्तरावर प्रवेश होतात. अशा कनिष्ठ महाविद्यालयांनी ऑफलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरवात करण्यात येणार आहे. कोटाअंतर्गत प्रवेशासाठीही पसंतीच्या महाविद्यालयांना ऑनलाइन अर्ज करता येईल. सीबीएससीच्या निकालानंतरच प्रत्यक्ष प्रवेश फेरींना सुरवात होणार आहे.
पसंतीचे महाविद्यालय निवडण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून (ता.२२) सूरू होणार आहे. पुणे-पिंपरीचिंचवडसह मुंबई, नाशिक, औरंगाबाद शहरांतील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे होत आहे. दहावीचा निकाल लागून महिना झाला आहे. अकरावी प्रवेशासाठीचा दुसरा भाग कधी भरायचा या बद्दल विद्यार्थी संभ्रमात होते. काही कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली नसल्याने प्रवेश प्रक्रियेला प्रचंड विलंब झाला होता.
शहरी भागात अकरावीला प्रवेश घेणारे विद्यार्थ्यांमध्ये सीबीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे सीबीएससीच्या दहावीच्या निकालानंतरच प्रत्यक्ष प्रवेश देण्यास सुरवात होणार आहे. तो पर्यंत, ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा पहिला भाग भरला आहे. अशा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांच्या पसंतीक्रमांकासाठी भाग दोनही भरून ठेवावा.