नवी दिल्ली: सणांआधी जुन्या वाहनांना भंगारात देऊन नवीन वाहनांच्या खरेदीवर सवलत देण्याचे प्रमुख व्यावसायिक आणि प्रवासी वाहन कंपन्यांनी मान्य केले आहे. मंगळवारी अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, हा उपक्रम देशातील अर्थव्यवस्थेला गती, स्वच्छ, सुरक्षित आणि अधिक कार्यक्षम वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी भारत मंडपम येथे सियाम (सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स) या ऑटो कंपन्यांची सर्वोच्च संस्था असलेल्या शिष्टमंडळाची बैठक घेतली.
निवेदनात म्हटले आहे, वाहन भंगारमध्ये जमा केल्याच्या प्रमाणपत्राच्या (स्क्रॅपेज सर्टिफिकेट) बदल्यात मर्यादित कालावधीसाठी सूट देण्याचे मान्य केले आहे. त्यात म्हटले आहे की, व्यावसायिक वाहन उत्पादक दोन वर्षांसाठी सूट देण्यास तयार आहेत आणि प्रवासी वाहन उत्पादक एक वर्षासाठी सूट देण्यास तयार आहेत. या सवलतीमुळे जुनी वाहने भंगारात बदलण्यास प्रोत्साहन मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे. यामुळे रस्त्यावर सुरक्षित, स्वच्छ आणि अधिक कार्यक्षम वाहने येण्याची खात्री होईल.