नवी दिल्ली : औषधांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे अशी औषधे खरेदी करणे सर्वसामान्यांना परवडणारे नव्हते. मात्र, आता देशातील 54 जीवनावश्यक औषधांच्या किमती कमी करण्याबाबतचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.
‘नॅशनल फार्मास्युटिकल प्राईसिंग अथॉरिटी’ अर्थात एनपीपीएच्या 124 व्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. एनपीपीए देशात विकल्या जाणाऱ्या अत्यावश्यक औषधांच्या किमती ठरवते, ज्याचा वापर सामान्य लोक करतात. या बैठकीत एनपीपीएने निश्चित केलेल्या 54 औषधांच्या किमतींमध्ये प्रतिजैविक, व्हिटॅमिन डी, मल्टी व्हिटॅमिन, कानाची औषधे इत्यादींचा समावेश आहे.
सध्या देशात 10 कोटींहून अधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत. हे जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे. मधुमेहाच्या रुग्णांना नियमित औषधांवर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत 10 कोटींहून अधिक मधुमेहाच्या रुग्णांना कमी झालेल्या या किमतीचा मोठा फायदा होणार आहे. औषधांच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.