मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) नियमांचे पालन न करणाऱ्या पाच सहकारी बँकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील दोन बँकांचाही समावेश आहे. आरबीआयने या बँकांना 9.25 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमांचे पालन आणि ग्राहकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हा दंड आकारण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेकडून राजपालयम को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेडला संचालक, त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांना दिलेली कर्जे आणि ॲडव्हान्स यावर आरबीआय निर्देशांचे पालन न केल्याबद्दल 75,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच हिमाचल प्रदेशातील मंडी येथील मंडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 6 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयच्या काही तरतुदींचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला आहे.
हावडा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडला आरबीआयच्या केवायसी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्याबद्दल 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. केवायसी तपशील नियमितपणे अपडेट करण्यात बँक अपयशी ठरली आहे. तसेच यामध्ये महाराष्ट्रातील दोन बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात ‘स्टँडर्ड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, औरंगाबाद’ आणि एक्सलेंट सहकारी बँक, मुंबई या बँकांचा समावेश आहे.