नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) काही महत्त्वाचे बदल केले आहेत, ज्यामुळे सदस्यांसाठी क्लेम सेटलमेंट, म्हणजेच प्रॉव्हिडंट फंडमधून पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे. केंद्र सरकारने ही माहिती संसदेत दिली. सरकारने सांगितले आहे की, कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ) चे क्लेम सेटलमेंट सुलभ करण्यासाठी ऑटो मोड प्रोसेसिंग आणि डेटा सेंट्रलायझेशन यासारख्या अनेक तांत्रिक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या बदलांमुळे ईपीएफ क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया वेगवान तर होणार आहेच, त्याचबरोबर सदस्यांना कार्यालयात जाऊन कागदपत्रे जमा करण्याच्या त्रासातूनही मुक्ती मिळेल.
श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाने यांनी गुरुवारी राज्यसभेत लेखी उत्तर सादर केले. त्यात म्हटले की, ईपीएफओने अॅडव्हान्स क्लेमच्या ऑटो-मोड प्रोसेसिंगची मर्यादा १ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. पूर्वी ही सुविधा केवळ आजारपण आणि रुग्णालयात भरतीसाठी उपलब्ध होती. मात्र, आता ती हौसिंग, शिक्षण आणि विवाह यासारख्या इतर महत्वाच्या गरजांसाठीही लागू करण्यात आली आहे. सरकारच्या मते, आता ६० टक्क्यांपेक्षा जास्त अॅडव्हान्स क्लेमवर ऑटो-मोड पध्दतीने प्रक्रिया केली जात असून फक्त ३ दिवसांत निकाली काढले जात आहेत.