नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील जेवार विमानतळावरुन विमाने लवकरच परदेशासाठी उड्डाण करणार आहेत. ग्रेटर नोएडा येथील जेवार येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर ट्रायल रनची तारीख ठरली आहे. या विमानतळाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता उड्डाण केले जाणार आहे.
जेवार विमानतळावरून लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे. जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळावर फ्लाइट कॅलिब्रेशनच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याची चाचणी 15 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आली आहे. चाचणी दरम्यान, कॅलिब्रेशन फ्लाईट येथे उतरवण्यात आले. यादरम्यान धावपट्टी आणि लँडिंग सिस्टिमची चाचणी घेण्यात आली, जी यशस्वी झाली असून त्याचा अहवालही डीजीसीएला पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, पहिल्या टप्प्यातील यशस्वी चाचणीनंतर आता दुसऱ्या टप्प्यात 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत येथे विमाने सातत्याने उड्डाण करणार असून, त्यांची चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतर पूर्ण क्षमतेने विमानतळावर विमानांचे उड्डाण होणार असल्याची माहिती देण्यात आली.