नवी दिल्ली : भारतातील अनेक मोठ्या बँका आता बचत खात्यांवरील व्याजदर कमी करत आहेत, जेणेकरून बँका त्यांचे उत्पन्न वाढवू शकतील. गेल्या काही आठवड्यात, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि फेडरल बँकेने बचत खात्यांवरील व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सपर्यंत कपात केली आहे.
आता 50 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेवर 2.75 % व्याज मिळेल. त्याचप्रमाणे, देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय ऑक्टोबर 2022 पासून 10 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर 2.7 टक्के व्याज देत आहे. यापैकी काही बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदर 25 बेसिस पॉइंट्सपर्यंत कमी केले आहेत. बँकांमध्ये CASA (चालू खाते बचत खाते) प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्यामुळे हे घडत आहे. पूर्वी हे प्रमाण 39 टक्के होते. पण गेल्या एका वर्षात ते फक्त 22 टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.
CASA म्हणजे चालू खात्यातील ठेवी आणि बचत खात्यातील ठेवींचे प्रमाण आहे. याचा अर्थ बँकांना ठेवी उभारणे कठीण होत आहे. बँका त्यांचे खर्च कमी करण्यासाठी व्याजदर कमी करत आहेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे बँकांना कठीण काळातही नफा मिळविण्यास मदत होताना दिसत आहे.