Banking News : मुंबई : भारतीय स्टेट बँकेने बँकिंग सेवांचा लाभ घेण्याची सुलभता आणि सुविधा वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यानुसार, आपल्या ग्राहकांसाठी ‘मोबाईल हँडहेल्ड डिव्हाईस’ लाँच करण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हे उपकरण हातात धरण्यासारखं असल्याने ते कुठंही नेता येणार आहे. हे उपकरण थेट ग्राहकांच्या दारापर्यंत बँकिंग सेवा आणून बँकिंग सुलभतेत क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज झाले आहे.
‘मोबाईल हँडहेल्ड डिव्हाईस’ लाँच
एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचा उद्देश आर्थिक समावेशन सशक्त करणे आणि आवश्यक बँकिंग सेवा जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे. हे उपकरण ग्राहकांसाठी फायद्याचे ठरणार असल्याचा विश्वास बँकेकडून व्यक्त केला जात आहे. या उपक्रमाचा फायदा विशेष करून आरोग्य समस्या असणारे ग्राहक, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लोक यांसारख्या ग्राहक सेवा बिंदू केंद्रात पोहोचवण्यासाठी असमर्थ असणाऱ्या ग्राहकांना होणार आहे.
बँक लवकरच या उपकरणाद्वारे सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत नावनोंदणी, खाते उघडणे, पैसे पाठवणे आणि कार्ड-आधारित सेवा यांसारख्या सेवांचा समावेश करून आपल्या सेवांचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. या उपकरणाच्या माध्यमातून सुरुवातीच्या टप्प्यात रोख पैसे काढणे, रोख ठेव, निधी हस्तांतरण, जमा रक्कम चौकशी आणि मिनी स्टेटमेंट यांसारख्या पाच अति महत्त्वाच्या बँकिंग सेवांचा लाभ घेता येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती बँकेकडून देण्यात येईल, असेही सांगण्यात आले.