नवी दिल्ली : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कारण, यातून चांगला परतावा मिळत असतो. अशीच आशा सणासुदीच्या काळातही लागलेली आहे. मात्र, परिस्थिती आता उलट झाल्याचे पाहिला मिळत आहे. दिवाळीपूर्वी शेअर मार्केटमधील परिस्थिती बिघडल्याचे समोर आले आहे. गुंतवणूकदारांचे एक-दोन नाहीतर तब्बल 40 लाख कोटींचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने तोटा होत असल्याचे दिसत आहे. वर्षानुवर्षे प्रतीक्षा केल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ जे हिरवे होते, ते महिनाभरात लाल झाले आहेत. बहुतेक किरकोळ गुंतवणूकदारांचे जे वर्षभरात काही कमावले होते ते काही दिवसांतच संपलं. या अर्थाने कोविडनंतर प्रथमच इतकी घट दिसून आली. गेल्या महिनाभरात किती नुकसान झाले याची आकडेवारी विचार करायला लावणार आहे. यामध्ये एका महिन्यात गुंतवणूकदारांचे 40 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
निवडक मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्स गेल्या एका महिन्यात 50 टक्क्यांनी घसरले आहेत. सेन्सेक्स त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून सुमारे 6500 अंकांनी आणि निफ्टी सुमारे 2100 अंकांनी घसरला आहे. निफ्टी 8 टक्क्यांहून अधिक घसरला आहे, तर सेन्सेक्समध्येही 8 टक्क्यांची घसरण झाली आहे.