पुणे : दारू पिण्याच्या बहाणा करून मित्रांनी खून करून मृतदेह ओढ्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार च-होली बुद्रुक येथे शनिवारी (ता. २४) उघडकीस आला आहे. याप्रकरणी दिघी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
मोहम्मद जहीर सुनशरीफ शेख उर्फ सलीम (वय ३४, रा. लोहगाव, पुणे) आणि गिरीश गुलाब गायकवाड (वय ४४, रा. लोहगाव, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर गणेश लक्ष्मण गायकवाड (वय ३४, रा. हडपसर, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गणेशच चुलत भाऊ तुषार हरिदास गायकवाड (वय ४०, रा. धनकवडी, कात्रज, मूळ रा. रिसे, ता. पुरंदर) यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश गायकवाड याचे मोहम्मद शेख उर्फ सलीम आणि गिरीश गायकवाड हे दोन मित्र होते. तिघांनाही दारू पिण्याचे व्यसन होते. आरोपी मोहम्मद शेख उर्फ सलीम आणि गिरीश गायकवाड यांनी गणेश गायकवाड दारू पिण्याच्या बहाण्याने चन्होली बुद्रुक येथे नेले.
त्यानंतर आरोपींनी गणेशच्या डोक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले. आणि या मारहाणीत गणेशचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी गणेशचा मृतदेह ओड्यात फेकला. तब्बल दोन आठवडे मृतदेह पाण्यात होता. त्यानंतर शनिवारी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गणेशच चुलत भाऊ तुषार हरिदास गायकवाड (वय ४०, रा. धनकवडी, कात्रज, मूळ रा. रिसे, ता. पुरंदर) यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल होताच दिघी पोलिसांनी तपास करून आरोपी मोहम्मद शेख उर्फ सलीम आणि गिरीश गायकवाड यांना अटक केली आहे. तरी, पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.