हनुमंत चिकणे
लोणी काळभोर, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोल नाका ते कासुर्डी या दरम्यान रस्त्याच्या मध्यभागापासुन दोन्ही बाजुकडील १५ मीटर (सुमारे पन्नास फुट) अंतराच्या आतील सर्व प्रकारची अतिक्रमणे काढण्यास सोमवारी (ता. १४) अतिक्रमण विरोधी पथकाने जोरदार सुरूवात केली आहे.
अतिक्रमणे वाचविण्यासाठी येणारा राजकीय दबाव निष्फळ ठरत असून साहजिकच कारवाईतील मोठे नुकसान टाळण्यासाठी लोक स्वतःहूनच अतिक्रमण काढून घेत असल्याचे चित्र सध्या कदमवाकवस्ती, लोणी काळभोर परिसरात दिसून येत आहे. टोलनाका ते लोणी स्टेशन परिसरात नागरिक स्वतःहून फॅब्रिकेशन व्यवसायिकांकडून अतिक्रमण काढून घेत आहेत, त्यामुळे फॅब्रिकेशन व्यवसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावरील पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी स्टेशन, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, व उरुळी कांचन परिसरात अतिक्रमणांची संख्या मोठी असल्याने ही कारवाई किमान आठवडाभर चालणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. कारवाई थांबविण्यासाठी कोणताही राजकीय हस्तक्षेप चालत नसल्याचा अनुभव काहींना आला. त्यामुळे परिसरात सध्या साऱ्यांनीच अतिक्रमण स्वतःहून काढण्यास सुरुवात केली आहे. अतिक्रमणे हटविल्याने महामार्ग रुंदीकरणासह सेवा रस्ते विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, एन. एच. ए. आयचे अभियंता रोहन जगताप म्हणाले, पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, माळीमळा, कुंजीरवाडी, उरुळी कांचन, दौंड तालुक्यातील कासुर्डी या ठिकाणी अतिक्रमणां विरोधातील कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कारवाई आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी स्वतःहून अतिक्रमण काढावीत. अतिक्रमणे स्वतःहुन न हटविल्यास, अतिक्रमण कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसुल करण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या अतिक्रमणधारकांने खर्च देण्यास नकार दिल्यास, तो खर्च संबधितांच्या सातबारावर चढविला जाणार आहे.
अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले
पुणे-सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण करून व्यवसाय थाटले आहेत. हातगाडी व्यवसायिक, टपरीधारक व जागा भाड्याने देणे असा गोरखधंदा सुरू आहे. यातून वादाचे प्रसंग निर्माण झाले होते. शहरातील विविध भागातील अतिक्रमणाविरुद्ध धडक मोहीम घेण्यात आली आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.