पुणे : सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला वेल्हे व हवेली तालुक्याच्या हद्दीवरील कोंडगाव व खामगाव मावळ परिसरात गुरुवारी (ता.२९) सायंकाळी खासगी माळरानात वणवा लागला. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी जनावरांच्या चार्याचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. विजेच्या तारांचे घर्षण होऊन ठिणग्या पडल्या आणि हा वणवा लागल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव मावळ येथील सविता मुरलीधर भोसले या माळरानात गवत कापत असताना विजेच्या तारांचे घर्षण होऊन ठिणग्या पडल्या. त्या वेळी जोरदार वारा वाहत असल्याने परिसरातील वाळलेल्या गवताने पेट घेऊन परिसरात वनव्याचा भडका उडाला. त्या वेळी शेजारी भाताची मळणी करणारे मावळा संघटनेचे प्रशांत भोसले, खामगाव तंटामुक्त समितीचे हर्षद भोसले आदी शेतकर्यांनी आरडाओरडा केला.
त्यामुळे सविता भोसले गवत कापण्याचे सोडून धावत खानापूर-वेल्हे रस्त्यावर आल्या आणि सुदैवाने त्यांचे प्राण वाचले. याबाबत शेतकर्यांनी खानापूर येथील महावितरणाच्या अधिकारी व कर्मचार्यांना माहिती दिली आहे. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी आले नसल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
दरम्यान, या वनव्यात जवळपास शंभर एकर क्षेत्रातील गवत व शेतकर्यांनी जनावरांसाठी कापून ठेवलेला चारा भस्मसात झाला. आग आटोक्यात आणण्यासाठी शेतकर्यांनी प्रयत्न केले. मात्र, जोरदार वार्यामुळे हा वनवा आणखी भडकला.