पुणे : पोरांना गेटमधून आत का सोडले असे म्हणत दोन सुरक्षारक्षकांवर एकाने कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना खानापूर (ता. हवेली) परिसरात मंगळवारी (ता. २८) रात्री आठच्या सुमारास घटना घडली.
आकाश गणपत भिकुले (वय -२७ आनंदवन सोसायटी, खानापूर ता. हवेली) असे वार करणाऱ्याचे नाव आहे. तर गोविंद शिवाजी काकडे व ज्ञानेश भिमराव कांबळे अशी गंभीर जखमी झालेल्या दोन सुरक्षारक्षकांची नावे आहेत. याप्रकरणी आकाश भिकुले याच्या विरोधात हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश भिकुले याची काही तरुणांसोबत बाचाबाची झाली होती. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास तरुण आनंदवन सोसायटीतील भिकुले याच्या घरी आले व त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली. ते तरुण गेल्यानंतर आकाश भिकुले हा गेटवर आला व तुम्ही त्या पोरांना आतच कसे सोडले असे म्हणत सुरक्षारक्षकांबरोबर भांडणे करू लागला.
या वादविवादात अचानक आकाश भिकुले याने सोबत आणलेल्या कोयत्याने ज्ञानेश कांबळे याच्या डोक्यावर वार केला. त्यावेळी गोविंद काकडे हा सुरक्षारक्षक भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्याच्याही पायावर आकाशने वार केले. सुरक्षारक्षकांनी आरडाओरड केल्यानंतर आकाश भिकुले तेथून पळून गेला. याबाबत माहिती मिळताच हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
दरम्यान, जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून आकाश भिकुले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश भिकुले हा सध्या फरार असून सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे अधिक तपास करत आहेत.