उरुळी कांचन, (पुणे) : किरकोळ कारणावरून एकाने दोघांवर धारधार शास्त्राने वार केल्याची घटना उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. गुरुवारी (ता. १६) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गोळेवस्ती परिसरात हि घटना घडली असून यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत.
राजू हारले (वय- ३८, रा. गोळेवस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) अशी वार केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर किरण बुवासाहेब कसबे (वय- ३७) व विकास साहेबराव मोहिते (वय- ३५, दोघेही गोळेवस्ती) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी राजू हारले फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजू हारले याचे गोळेवस्ती परिसरात एक किराणा दुकानाची टपरी आहे. या टपरीत विकास मोहिते हा अंडी आणण्यासाठी गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गेला होता. यावेळी राजू हारले याने उशीर झाल्याने दुकान बंद केले होते. या टपरीत हारले यांचा अल्पवयीन मुलगा झोपला होता. यावेळी हारले व मोहिते यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
यावेळी दुकानात सुरु असलेला वाद हारले याने पाहिला व त्याने मोहिते याच्यावर चिडून येऊन धारधार शास्त्राने वार केला. यावेळी किरण कसबे याने भांडणे सोडवण्यासाठी मध्यस्ती केली. यावेळी हारले याने किरण याच्यावरहि धारधार शास्त्राने वार केले.
दरम्यान, दोघांनाही उपस्थित नागरिकांनी उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून आरोपी हारले हा पळून गेला आहे. सदर ठिकाणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे, मोहिते, पोलीस हवालदार बाळासाहेब पांढरे, संतोष अंदुरे, महेश करे आदींनी भेट दिली आहे. तपास पोलीस हवालदार संतोष होले करीत आहेत.
मागील पंधरा दिवसात दुसरा हल्ला..
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत मोबाईल फोन परत न दिल्याच्या कारणावरून तिघांनी एका तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. आरोपींनी तरुणाला मारताना ‘आम्ही इथले भाई आहोत. कोणी आमच्या मध्ये यायचे नाही. कोणी आले तर त्याचा पण कार्यक्रम करू’ असे म्हणत दहशत निर्माण केली. याप्रकरणी तीन जणांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण लक्ष देणार का?
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील पंधरा दिवसात किरकोळ कारणावरून धारधार शास्त्राने वार झाले आहेत. शशिकांत चव्हाण यांच्या समोर पुर्व हवेलीमधील स्वयंमघोषित राजकीय नेते व बोगस पत्रकार, विविध संघटनांच्या नावाखाली कथित पुढाऱ्यांचा पोलिस ठाण्यातील वावर कमी करणे, कायदा-सुव्यवस्था कायम राखणे, गुन्हे अन्वेषण वाढविणे, असामाजिक तत्वांवर लगाम लावणे, जनसामान्यांमध्ये पोलिसांची प्रतिमा मलीन न होऊ देणे, पोलिस ठाण्याच्या नवीन जागेसाठी पाठपुरावा करणे या सर्व बाबींचे मोठे आव्हान असणार आहे. सोबतच सायबर क्राईम, पोलिस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ दुकानदारांकडून खंडणी वसुलीसह स्ट्रीट क्राईम करणाऱ्या फळकुट दादांकडेही चव्हाण यांना लक्ष द्यावे लागणार आहे.