उरुळी कांचन : “खाकी वर्दीतील माणुसकी आणि तत्परता” काय असते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा उरुळी कांचन परिसरातील नागरिकांना आला आहे. चारचाकी गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटून कॅनॉलमध्ये लटकलेल्या अवस्थेत असलेल्या गाडीतील चालकाला उरुळी कांचन पोलिसांनी अत्यंत शिताफीने सुखरूप बाहेर काढले. शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील काळे शिवार परिसरातील शनिवारी (ता.19) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंदा लक्ष्मण ढोपुकसे (वय 40, रा. मुंबई) हे आपल्या ताब्यातील मारुती इर्टिगा कार (क्र. MH 48 CQ 1825) घेऊन मौजे शिंदवणे हद्दीतील काळे शिवार येथील शिवा फार्मसमोरील कॅनॉल काठावरून जात होते. यावेळी पहाटेच्या सुमारास चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार थेट कॅनॉलच्या दिशेने घसरली.

कार थेट कॅनॉलमध्ये कोसळणार एवढ्यात चालकाने प्रसंगावधान राखून जोरात हॅन्डब्रेक लावला. मात्र, तोपर्यंत गाडीची तीन चाके कॅनॉलच्या हवेत आणि पाण्यात लटकली होती. गाडी फक्त एका चाकावर आणि हॅन्डब्रेकच्या आधारावर कॅनॉलच्या कड्यावर थरथरत उभी होती. गाडीतून थोडेही हालणे थेट मृत्यूला आमंत्रण देणारे होते. अशा भयानक परिस्थितीत घाबरलेल्या चालकाने जीव मुठीत धरून पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ‘डायल 112 ‘ या पोलीस मदत क्रमांकावर संपर्क साधला.
डायल 112 कडून संदेश मिळताच, उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील रात्रगस्त ड्युटीवर तैनात असलेले पोलीस शिपाई विकास लगस आणि पोलीस हवालदार बोत्रे यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने घटनास्थळाकडे शासकीय वाहनाने धाव घेतली. घटनास्थळी पोहोचताच पोलिसांना परिस्थितीचे गांभीर्य ओळखले व गाडीतील चालक प्रचंड घाबरलेला दिसून आला व भीतीने थरथर कापत होता.
पोलीस शिपाई लगस व हवालदार बोत्रे यांनी सर्वप्रथम चालकाला धीर देत अजिबात न हालण्याची सूचना केली. त्यानंतर पोलिसांनी कारला मजबूत दोरी बांधली. स्वतः ताकद लावून आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार मागच्या बाजूला ओढून कॅनॉलच्या कडेवरून कारसह चालकाला अत्यंत सुखरूप बाहेर काढले.
दरम्यान, कार कॅनॉलच्या बाहेर सुरक्षित येताच चालक आनंदा ढोपुकसे यांनी सुटकेचा श्वास सोडला. पोलिसांनी पहाटेच्या अंधारात दाखवलेली तत्परता आणि देवदूतासारखी केलेली मदत यामुळे त्यांचा जीव वाचला होता. तात्काळ मदत मिळाल्यामुळे चालक ढोपुकसे यांनी उरुळी कांचन पोलिसांच्या या धाडसी आणि संवेदनशील कामगिरीबद्दल अश्रूभरल्या डोळ्यांनी पोलीस प्रशासनाचे खूप खूप आभार व्यक्त केले. पोलिसांच्या या कामगिरीचे उरुळी कांचन व परिसरात कौतुक होत आहे.







