पुणे : ऑनलाइन गेमिंग आणि क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहाराच्या बहाण्याने नाशिकमधील एका 22 वर्षीय तरुणाचे अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कल्याण सरकारी रेल्वे पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने तत्परतेने कारवाई करत पीडित तरुणाची हरियाणामधून सुखरूप सुटका केली आहे.

नाशिक येथे राहणाऱ्या नील खेतिया या तरुणाला ऑनलाइन गेमिंगचे व्यसन होते. गेममधील विविध फीचर्स खरेदी करण्यासाठी त्याला USDT या क्रिप्टोकरन्सीची गरज होती. गुजरातमधील एका मित्राने नीलला बाजारातील दरापेक्षा स्वस्त दरात, म्हणजेच 96.50 रुपये प्रति युनिट दराने USDT मिळवून देण्याचे सांगितले. नीलने यातून थोडा नफा मिळवण्याच्या आशेने संभाव्य खरेदीदारांशी ऑनलाइन संपर्क साधला.
याच व्यवहाराच्या निमित्ताने आरोपींनी नीलला जयपूर येथे भेटण्यासाठी बोलावले. 12 ऑक्टोबर रोजी नील जयपूरला गेला, जिथे आरोपींनी त्याचे अपहरण केले आणि त्याला ओलीस ठेवले. त्यानंतर आरोपींनी त्याला हरियाणामध्ये हलवले.नीलचा फोन बंद आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला आणि कल्याण रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी नीलच्या वडिलांना फोन करून 15 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास मुलाला मारून टाकण्याची धमकी दिली आणि घरचे सोने विकून पैसे देण्यास सांगितले. एवढेच नाही तर आरोपींनी नीलच्या प्रेयसीलाही व्हिडिओ कॉल करून 7 लाख रुपयांची मागणी केली होती.

घटना गंभीर असल्याचे लक्षात येताच कल्याण जीआरपी आणि सायबर टीमने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांच्या पथकाने 19 ऑक्टोबर रोजी हरियाणामध्ये धाड टाकून नीलची सुटका केली. या कारवाईत ‘नवीन’ आणि ‘मंगला’ नावाच्या दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
पुढील कायदेशीर कारवाई आणि तपासासाठी दोन्ही आरोपींना जयपूरच्या प्रताप नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे डीसीपी प्रज्ञा झेडगे यांनी सांगितले.







