पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत रत्नागिरी जिल्ह्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.जिल्ह्यातील तब्बल 1,05,521 महिलांचे अर्ज विविध कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आले आहेत. अर्ज नामंजूर झाल्यामुळे या महिलांच्या बँक खात्यात अद्याप योजनेचे पैसे जमा होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे 1500 रुपये कायमचे बंद होणार का ही चिंता त्यांना लागून राहिली आहे.

दुसरीकडे मात्र प्रशासनाने महिलांना दिलासा देत स्पष्ट केले आहे की, ज्यांचे अर्ज केवळ तांत्रिक त्रुटींमुळे बाद झाले आहेत, त्यांना आपल्या अर्जात सुधारणा करण्याची पुन्हा संधी दिली जाणार आहे.महिला व बालविकास विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातून या योजनेसाठी एकूण 3,77,047 अर्ज आले होते. छाननीअंती यातील 2,71,956 महिलांचे अर्ज वैध ठरले असून, त्यांच्या खात्यात शासनातर्फे थकीत रक्कम देखील जमा करण्यात आली आहे. उर्वरित अर्जांमध्ये काही त्रुटी आढळल्याने ते तात्पुरते अपात्र करण्यात आले आहेत.

या योजनेतील अर्ज अपात्र ठरण्याची मुख्य कारणे म्हणजे बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसणे, कागदपत्रांची ई-केवायसी (e-KYC) अपूर्ण असणे.कुटुंबात चारचाकी वाहन असणे किंवा कोणी सरकारी नोकरीत असणे.कुटुंबातील सदस्य करदाता (Income Tax Payer) असणे.वयोमर्यादेचे नियम न बसणे किंवा फॉर्म भरताना चुकीची माहिती देणे ही आहेत.

दरम्यान, या सततच्या पडताळणी आणि केवायसी प्रक्रियेवर काही महिलांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. वारंवार बँक आणि सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याने महिलांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याची भावना रत्नागिरीतील लाभार्थी महिलांनी बोलून दाखवली.
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे की, तांत्रिक कारणांमुळे योजनेपासून वंचित राहिलेल्या महिलांनी घाबरून न जाता, आपल्या बँकेत जाऊन आधार लिंकिंग आणि ई-केवायसी तातडीने पूर्ण करून घ्यावी. फॉर्ममधील चुका दुरुस्त केल्यानंतर पात्र महिलांना या योजनेचा लाभ नक्की दिला जाईल, असे सांगण्यात आले आहे.







