हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांनो सावधान. आपल्या घरातील किंमती ऐवजाची व आपापल्या महागड्या दुचाकी व चारचाकी गाड्यांची काळजी घ्या. कारण लोणी काळभोर, उरुळी कांचन, कोरेगाव मूळसह परिसरात मागील काही दिवसांपासून चोऱ्या, घरफोड्या व वाहनचोरीचे प्रमाण वाढत चालले आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी,चारचाकी व दुचाकी चोरून नेल्याच्या तक्रारी लोणी काळभोर पोलिसांकडे आल्या आहेत. यामध्ये उरुळी कांचन येथील एका चारचाकी गाडीच्या चोरींचा समावेश आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तसेच उरुळी कांचन पोलीस दूरक्षेत्र परिसरात तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते बीट मार्शलचे मोठ्या थाटामाटात स्वागतही करण्यात आले होते. यामुळे चोऱ्या व घरफोड्या कमी होतील हा पोलिसांचा दावाही, मागील काही दिवसांतील चोऱ्यांमुळे फोल ठरला आहे.
लोणी काळभोर पोलिसांच्या हद्दीत मागील दीड वर्षापूर्वी उरुळी कांचन येथे अज्ञात दरोडेखोरांनी एका महिलेला मारहाण करून सोन्याचे दागिने लुटून नेले होते. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, अद्यापही त्याचा तपास लागू शकला नाही. उरुळी कांचन येथील दातार कॉलनी परिसरात महिलादिनाच्या दिवशीच अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून किमती ऐवज व रोख रक्कम चोरून नेली होती.
गुरुवारी (ता. ५) मध्यरात्री उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील मोबाईल, हार्डवेअरसह आदी सहा प्रकारची दुकाने फोडल्याची घटना घडली आहे. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनेक घरफोड्या व चोरीच्या घटनांचा अद्याप तपास नाहीच !
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक दुचाकी व चारचाकी गाडी चोरीला गेल्या आहेत. तसेच पुणे-सोलापूर महामार्गावर मोठमोठे अपघात झाले आहेत. या अपघातात अनेकांना आपल्या जीवाशी मुकावे लागले आहे. या अपघातात अज्ञात वाहने धडक देऊन निघून गेली. मात्र, त्या वाहनांचा व चालकांचा अजूनही थांगपत्ता मिळू शकला नाही. तसेच अनेक घरफोड्या व वाहने चोरीच्या घटना अद्याप ‘अनडिटेक्ट’च आहेत.