उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत वाहनचोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. फॉर्च्युनर गाडी चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा उरुळी कांचन येथून शनिवारी (ता.२६) पहाटे आणखी एक ६५ हजार रुपयांची हुंदाई कंपनीची सॅन्ट्रो चारचाकी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यातच सोमवारी (ता. २८) रात्री उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील गिरमे वस्ती परिसरात घरफोडी झाल्याची घटना घडली आहे.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत रविवारी भरणाऱ्या आठवडे भाजीमंडई बाजारात मोबाईल फोन चोरीला गेल्याची घटना प्रत्येक रविवारी घडत आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी रविवारच्या आठवडे बाजारात चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याचा व एका पत्रकाराच्याही मोबाईलवर चोरट्यांनी डल्ला मारला होता. त्यामुळे उरुळी कांचन येथील आठवडे बाजारात मोबाईल चोरट्यांचे सत्र अद्यापही सुरूच आहे. एवढ्या घटना होऊनही चोर का मिळत नाहीत अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहेत.
दिवसभर काम करून कामगार व नोकरदार यांना रविवारी सुट्टी असल्याने उरुळी कांचन येथे आठवडे बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी येतात. त्यावेळी काही चोर हे एखाद्याचा पाठलाग करून किंवा हातचलाखीने मोबाईल चोरी करू लागले आहेत. त्यामुळे बाजारात सर्वसामान्य नागरिक व इतर नागरिकांचे मोबाईल चोरी करणारी चोरट्यांची टोळी सक्रीय झाल्याची चर्चा नागरिक करू लागले आहेत. आठवडे बाजारात मागील काही दिवसांपासून मोबाईल चोरांचा सुळसुळाट सुरु आहे. यामध्ये काही नागरिक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येत नाहीत तर काहीजण तक्रार टाळाटाळ करीत आहेत.
उरुळी कांचन पोलीस चौकीचा नवीन नियम?
उरुळी कांचन पोलीस चौकीच्या हद्दीत सोमवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे. या घटनेतील तक्रारदार हे सकाळी तक्रार देण्यासाठी गेले होते. मात्र, संध्याकाळच्या पाच वाजले तरीही त्यांची तक्रार घेतली जात नाही. नेमके याचे गौडबंगाल काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत. तसेच तासनतास तक्रार देण्यासाठी आलेल्या नागरिकांना वेठीस धरण्याचे काम उरुळी कांचन चौकीतील पोलीस करू लागले आहेत. त्यामुळे चोरीचा गुन्हा नोंद करायला एवढा वेळ लागत असेल तर तापसाचे काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
पोलिसांच्या नाकावर टिच्चून घरफोड्या..
पोलिसांच्या नाकावर टिच्चून घरफोड्या झाल्याच्या अनेक घटना सर्वश्रुत आहेत. यामुळे शहरातील गुन्हेगारांना आता खाकीचा धाक उरला नाही, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. दिवसाढवळ्या कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत घरफोडी झाली होती. तसेच काही छोट्या मोठ्या घटना या कायम सुरु असून लोणी काळभोर पोलीस मात्र काहीच होत नसल्याचा आव आणीत आहेत. सर्व काही सुरळीत असल्याचे दाखवीत आहेत.
नेटवर्क संपले ; डीबी कुठंय?
लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे सध्या खबऱ्यांचे नेटवर्क संपले आहे. मागील काही दिवसांपासून लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोरट्यांचा धुमाकुळ सुरु असून, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. उरुळी कांचन जवळील सोरतापवाडी येथे सुरक्षारक्षकाच्या कानाला पिस्टल लावून चारचाकी कारची चोरी करून चोर निघून गेले होते. त्याचाही शोध लागला नाही. २० दिवसांपूर्वी फॉर्च्युनर गाडी चोरीला गेली होती तीअचाही शोध लागू शकला नाही. त्यामुळे तगडी पोलिस यंत्रणा असतानाही लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा वाढत्या घटनांमुळे लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत. तर लोणी काळभोर पोलीस मात्र ‘ऑल इज वेल’ असल्यासारखे वागत आहेत.
अनेक घरफोड्या व वाहने, चोरीच्या घटना अद्याप ‘अनडिटेक्ट’च…!
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक दुचाकी व चारचाकी गाडी चोरीला गेल्या आहेत. तसेच पुणे – सोलापूर महामार्गावर मोठमोठे अपघात झाले आहेत. या अपघातात अनेकांना आपल्या जीवाशी मुकावे लागले आहे. या अपघातात अज्ञात वाहने धडक देऊन निघून गेली. मात्र, त्या वाहनांचा व चालकांचा अजूनही थांगपत्ता मिळू शकला नाही. तसेच अनेक घरफोड्या व वाहने चोरीच्या घटना अद्याप ‘अनडिटेक्ट’च आहेत.