Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी दारु तयार करणे, विक्री करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या शिंदवणे (ता. हवेली) येथील महिलेविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली. पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची ४१ वी कारवाई आहे.
सरस्वती संतोष राठोड (वय-३६, रा. काळेशिवार, शिंदवणे, ता. हवेली जि. पुणे) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.
गुन्हेगारी कृत्यांमुळे नागरिकांच्या आरोग्य व जीवीतास धोका निर्माण
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सरस्वती राठोड हि महिला अट्टल गुन्हेगार असून तीने तीच्या साथीदरांसह गावठी दारु तयार करणे, विक्री करणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. तीच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य व जीवीतास धोका निर्माण होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. तसेच तीच्या दहशतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.
आरोपी सरस्वती राठोड हिच्या विरोधात मागील पाच वर्षात ४ गुन्हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आरोपीविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आरोपी सरस्वती राठोड हिला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
सदरची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण व पुणे पोलीस गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.टी. खोबरे यांनी केली.