उरुळी कांचन, (पुणे) : हिंगणगाव (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गडवस्ती परिसरात रविवारी (ता. १३) पहाटे पाच ठिकाणी घरफोडी केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेत एक दुचाकी, रोख रक्कम, साडेपाच लाख रुपयांचे ११ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण सात लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
माणिक बबन थोरात (वय- ७२), विठ्ठल दिनकर थोरात (वय-५८), आप्पा रामजी थोरात (वय- ५०), जयसिंग बबन थोरात, (वय-६०), व ज्ञानेश्वर शंकर गडदे (वय- ५५, रा. सर्वजण गडवस्ती, हिंगणगाव, ता. हवेली) अशी चोरी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. माणिक बबन थोरात यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात फिर्यादीसह परिसरातील वरील चौघांच्याही घरी घरफोडी झाल्याचा तक्रारीत उल्लेख केला आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगणगाव ग्रामपंचायत हद्दीतील गडवस्ती परिसरात वरील सर्वजन राहतात. शनिवारी (ता. १२) सर्वजण जेवण करून झोपले होते. यावेळी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे माणिक थोरात, त्यांच्या पत्नी व त्यांचा नातू हे घराच्या बाहेर असलेल्या ठिकाणी झोपले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त केले. तसेच घरात असलेले सोन्याचे ५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम दोन हजार रुपये पळवून नेले.
दरम्यान त्यांच्या घरापासून शंभर ते दीडशे मीटर अंतरावर राहणारे विठ्ठल थोरात यांच्या घरातून अडीच तोळे सोन्याचे दागिने, साहित्य चोरून नेहले. आप्पा रामजी थोरात यांच्या घरासमोर लावलेली एक दुचाकि तर जयसिंग बबन थोरात यांच्या घरातील २० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी पळविली आहे.
दरम्यान, ज्ञानेश्वर शंकर गडदे यांच्या घरात चोरट्यांना काहीही मिळून आले नसले तरी घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले होते. सदर ठिकाणी काळूराम थोरात व सहकाऱ्यांनी जाऊन पाहणी केली. व लोणीकंद पोलिसांशी संपर्क केला. लोणीकंद पोलिसांनी पाचहि ठिकाणी पाहणी करून पंचनामा केला आहे. तपास पोलीस करीत आहेत.