उरुळी कांचन, (पुणे) : लिफ्ट देण्याचा बहाणा करून उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका प्रवाश्याला चौघांनी चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना पुणे – सोलापूर महामार्गावर घडली आहे. बोरीऐंदी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत हि घटना घडली आहे.
याप्रकरणी आप्पासाहेब संभाजी हवालदार (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चौघांच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आप्पासाहेब हवालदार हे सोलापुर-पुणे महामार्गावरील एमटेक कंपनीच्या गेट समोर घरी जाण्यासाठी थांबले होते. यावेळी त्यांच्याजवळ दोन अनोळखी इसम आले व तुम्हाला उरुळी कांचन येथे सोडतो असे म्हणाले. यावेळी हवालदार हे दोघांच्या मध्यभागी बसले व उरुळीच्या बाजूने निघाले. यावेळी पाठीमागे बसलेल्या तरुणाने हवालदार यांना चाकूचा धाक दाखवला.
यावेळी त्यांच्याजवळ असलेली दुचाकी हि बोरीऐंदी ग्रामपंचायत हद्दीतील रोडच्या कडेला असणाऱ्या पत्रा शेड जवळील मोकळ्या जागेत घेऊन गेले. यावेळी त्यांना मारण्यास सुरुवात केली. यावेळी दुचाकी चालकाने त्यांच्या खिशातील मोबाईल व पॉकेट व रोख रक्कम काढुन घेवुन हाताने व लाथाबुक्यांनी जबर माराहण केली.
दरम्यान, त्यावेळी त्यांचे आणखी दोन साथीदार त्याठिकाणी आले व त्यांनीही हवालदार यांना हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच एकाने तळहातावर चाकु मारून दुखापत केली. यावेळी जीवे मारतील या भितीने हवालदार हे त्या ठिकाणावरून पळुन गेले. याबाबत यवत पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.