Uruli Kanchan | उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत पाण्याच्या टाकीत पडून एका २० महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. २३) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हर्ष सागर जगताप (वय – २० महिने, रा. आश्रम रोड, उरुळी कांचन, ता. हवेली) असे टाकीत बुडून मृत्यू झालेल्या बाळाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील आश्रम रोड परिसरात एका सदनिकेचे काम सुरु आहे. त्या सदनिकेला पाणी मारण्यासाठी त्या ठिकाणी एक पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. तसेच एका सुरक्षारक्षकाची नेमणूकही करण्यात आली आहे.
मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली घटना…
सदनिकेचे काम सुरु असून त्या ठिकाणी लहान मुले दररोज खेळत होती. मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हर्ष हा खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडला. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हर्ष कोठे दिसून न आल्याने त्याची शोधाशोध सुरु केली. यावेळी तो कोठेही मिळून आला नाही.
शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीत पहिले असता हर्ष हा दिसून आला. त्याला तात्काळ उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, सदर घटनेची लोणी काळभोर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तपास पोलीस करीत आहेत.