पुणे : दिवाळीच्या ऐन तोंडावर पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सदाशिव पेठ येथील एका बिर्याणी हाऊसमध्ये आग लागल्याने या आगीत एका ६ वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यु झाला. ही घटना आज शनिवार (ता. २२) सकाळी आकरा वाजण्याच्या सुमरास घडली आहे. या घटनेमुळे सगळीकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
इकरा नईम खान असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, सदाशिव पेठेतील भिकारदास मारुतीजवळील एका बिर्याणी हाऊसमध्ये आज शनिवार ( ता.२२ ) रोजी आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी तातडीने दाखल झाले. घटनास्थळावरुन 3 सिलेंडर बाहेर काढण्यात आले. तसेच आगीत एक ६ वर्षाची चिमुकली अडकली होती. या चिमुकलीला जवानांनी बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. ही आग नेमकी कुठल्या कारणामुळे लागली ही माहिती अजूनही समजू शकलेली नाही.