लोणी काळभोर, (पुणे) : खेळता – खेळता तोल गेल्याने दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने तीन वर्षांच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (ता. १९) रात्री घडली आहे. कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील जोरे वस्ती परिसरात बुधवारी (ता. ०९) हि घटना घडली होती.
श्लोक महेश सोनटक्के (वय- ०३, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्लोक सोनटक्के याचे वडील हे रिक्षाचालक असून ते परिवारासह कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत भाड्याने राहतात.
बुधवारी (ता. ०९) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास श्लोक हा दुसऱ्या मजल्यावर असलेल्या गॅलरीत खेळत होता. खेळता खेळता त्याचा तोल गेला व खाली जमिनीवर कोसळला. त्याला तत्काळ लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर मागील दहा दिवसांपासून उपचार सुरु होते.
दरम्यान, उपचारादरम्यान शनिवारी (ता. १९) संध्याकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले. या घटनेची माहिती लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरातील नागरिकांना समजली असता नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.