पुणे : पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यात पडून सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
आरव झोडगे (वय-६ वर्षे) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, घोडेगाव येथे डिंभे धरणाचा उजवा कालवा गेला आहे. या कालव्यात काही मुले पोहायला जात असतात. बुधवारी (ता.१ ) आरव मित्रासोबत कालव्याजवळ खेळायला गेला. कालव्याजवळ खेळत असताना आरवचा पाय घसरून तो कालव्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र त्याचा तपास लागू शकला नाही.
त्यानंतर कुकडी पाटबंधारे विभागाला कळवून कालव्याचे पाणी बंद करण्यात आले. परत कालव्याच्या कडेने त्याचा शोध घेत असताना रात्री १ च्या सुमारास त्याचा मृतदेह कालव्यामध्ये मिळून आला. या घटनेमुळे घोडेगाव परिसरात शोककळा पसरली आहे