पुणे : येरवड्यातील बाल सुधारगृहातून कोयता गँगमधील सात अल्पवयीन मुले पसार झाले होते. यातील दोन अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा परिसरात बाल सुधारगृहातून पसार झालेली दोन अल्पवयीन मुले येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील पोलीस हवालदार नामदेव रेणुसे यांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांच्या पथकाने दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांची वैद्यकीय तपासणी करुन गुन्हे शाखेने येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक निरीक्षक वैशाली भोसले, नामदेव रेणुसे, उत्तम तारु, प्रमोद कोकणे, गणेश थोरात, नागनाथ राख आदींनी केली आहे.