प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील विद्यार्थी अभ्यासाचे धडे गिरविण्याच्या ऐवजी बॉम्ब तयार करण्याचे धडे गिरवीत असल्याची घटना पुढे आली आहे. आणि विद्यार्थ्यांनी चक्क दोन गटांमध्ये वर्चस्व निर्माण करण्यासाठी तब्बल ३ महिने बॉम्बस्फोट घडविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी ११ विद्यार्थ्यांना अटक केली आहे. तर यातील १० विद्यार्थी अल्पवयीन आहेत. त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील प्रतिष्ठित शाळांमधील विद्यार्थ्यांनी वर्चस्व निर्माण करण्यासाठी टोळ्या तयार केल्या होत्या. आणि एकमेकांवर वचक बसवण्यासाठी बॉम्बस्फोट घडवले आहे. जुलैमध्ये शाळांच्या बाहेर बॉम्बस्फोटाच्या ५ घटना घडल्या आहेत. विद्यार्थ्यांनी संगम, एमपीव्हीएम,पतंजली ऋषीकुल, बॉईज हायस्कूल, बिशप जॉन्सन स्कूल परिसरात स्फोट बॉम्बस्फोट घडवून आणले आहेत.
पोलिसांनी सोमवारी बिशप जॉन्सन कॉलेजजवळ अनेक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. बॉम्ब कुठून आणले याबद्दल विचारणा केली असता, विद्यार्थ्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड झाली. आपण बॉम्ब कुठून आणले नाहीत, तर घरातच यूट्यूब पाहून तयार केल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
तसेच बाजारातून फटाके खरेदी करायचे, त्यातील दारुगोळा वेगळा करायचा. तो बॉम्बच्या निर्मितीसाठी वापरायचा. हा प्रकार गेले काही महिने सुरू असल्यची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या गटांशी त्यांच्या पालकांचादेखील संबंध असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांकडून पालकांना इशारा देण्यात आला आहे. तसेच स्फोट घडवणाऱ्यांविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.