पुणे : प्रवाशाने पीएमपी वाहकाच्या अंगठ्याचा चावा घेतल्याची घटना हडपसर येथील गाडीतळ स्थानकातून उघडकीस आली असून याप्रकणी पीएमपी वाहकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलिसांनी प्रवाशाला अटक केली आहे.
शिवराज साळुंखे (वय ३०, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे. मारुती बाळू सांगळे (वय ३९, रा. नायगाव रस्ता, कुंजीरवाडी, ता. हवेली) असे पीएमपी वाहकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीए ते हडपसर या मार्गावरील बस हडपसर येथील गाडीतळ स्थानकात थांबली असता, आरोपी साळुंकेने बसमध्ये प्रवेश करायचा प्रयत्न केला. त्यावेळी सांगळे यांनी बस मार्गस्थ व्हायची आहे, असे साळुंखे याला सांगितले. साळुंखे पीएमपी वाहक सांगळे यांच्यावर चिडून, मी पूर्वी पीएमपीमध्ये चालक होतो. तू मला शिकवू नको, असे सांगळे यांना सांगितले. त्यानंतर साळुंखेने सांगळे यांना शिवीगाळ करुन अंगठ्याचा चावा घेतला.
दरम्यान, सांगळे यांनी याप्रकणी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार साळुंखे याला पोलिसांनी अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.