पुणे : ताम्हीणी घाटात फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. २१) सकाळी उघडकीस आली आहे.
ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे आणि कृष्णा राठोड असे अपघातात मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. तर रोहन गाडे, प्रवीण सरकटे आणि रोशन चव्हाण अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. सर्वजण राहणार विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील आहेत.
मिळालेल्या महितीनुसार, वाशिम जिल्ह्यातून सहा तरुण पर्यटक फिरण्यासाठी ताम्हीणी घाटात आले होते. यावेळी कार घाटात आली असता घाटातील रस्त्याचा अंदाज न आल्यानं कार दरीत कोसळली, त्यात तिघांचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ताम्हीणी घाटात कार अपघात झाल्याची माहिती रायगड पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल झाले.
तातडीनं मदत व बचावकार्य सुरू केलं. त्यावेळी अपघातग्रस्त कारमध्ये तिघांचा जागीच मृत्यू झालेला होता, तर जखमी झालेल्या तीन जणांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.