दिनेश सोनवणे
दौंड : दौंड शहर व परिसरात तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीने हैदोस घातला असून तांब्याच्या तारा चोऱ्यांच्या घटनात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दौड पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे मोठे आवाहन आहे. त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मागील काही दिवसापासून चोरट्यांनी दौंड शहर व ग्रामीण भागात चोरटे हे भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कार्यालयातील केबल चोरी करू लागले आहेत. सदर चोरटे रात्रीच्या वेळी केबल चोरण्यासाठी दरवाजे व गेटचे कडीकोयंडा, लॉक तोडून थेट बीएसएनएल कार्यालयात प्रवेश करत आहेत.
दौंड शहरातील मुख्य टपाल कार्यालयाच्या मागील बाजूस बीएसएनएलचे कार्यालय आहे. या कार्यलयात सुरक्षा रक्षक म्हणून (प्रकाश ठाकूरदास सुखेजा वय- ६०) हे कंत्राटी पद्धतीवर काम करत होते. मंगळवारी (ता. २६) मध्यरात्री टेलिफोन एक्सचेंज मधील केबल व वायरी चोरी करायला आलेल्या अज्ञात चोरट्यांनी सुरक्षा रक्षक यांच्यावर तीक्ष्ण हत्याऱ्यांनी वार करून त्यांचा खून केल्याची घटना शहरात घडली होती. या घटनेचा दौंड पोलीस तपास करीत आहेत.
दरम्यान, कुरकुंभ येथील औद्योगिक विकास महामंडळ मधील बीएसएनएल च्या कार्यलयात चोरीचा प्रयत्न झाला आहे. तर केडगाव (ता दौंड) या ठिकाणी चोरी झाली आहे. केबल चोरणारी टोळी कुठली आहे.? चोरलेले केबल कुठे विकले जाते.? केबल वायर कोण विकत घेतो? सदर टोळी पर राज्यातील तर नाहीना तूर्तास मात्र या प्रश्नांची उत्तरे मात्र अनुउत्तरीत आहे. या सर्व घटनेचा तपास करण्याचे तगडे आवाहन दौंड पोलिसांसमोर आहे.