लोणी काळभोर : आमचे साहेब गरीबांना धान्य, कपडे वाटप करीत असल्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील तब्बल १ लाख १४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना हडपसर येथील कॅनॉलशेजारी असलेल्या आयसीआयसीआय बँकेजवळ मंगळवारी (ता.२८) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी एका ७६ वर्षाच्या महिलने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कॅनॉलशेजारी आयसीआयसीआय बँकेजवळ असताना, त्यांच्याजवळ तीन अनोळखी इसम आले. आणि फिर्यादी महिलेला म्हणाले कि, माझ्यासोबत चला, आमचा साहेब म्हातार्या माणसांना धान्य व कपडे वाटप करणार आहे. तसेच गोर गरीबांना पैसे पण देणार आहे.
दरम्यान, असे तीन जणांनी सांगून फिर्यादी यांना आयसीआयसीआय बँकेच्या इमारतीच्या डाव्या बाजूला असलेल्या एका बोळीमध्ये घेऊन गेले. त्यांचा विश्वास संपादन केला. व त्यांच्या गळ्यातील १ लाख १४ हजार रुपयांचे ४७ ग्रॅम वजनाचे दागिने काढून घेतले. आणि आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के करीत आहेत.