नागपूर: नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना गांजा पुरविण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यानीच रॅकेट सुरु केले असून १० ग्रॅम गंजासाठी पाच हजार, तर प्रतिमिनिट कॉलसाठी १०० रुपयांची मागणी करण्यात येत होती. या प्रकरणात गुन्हे शाखेने रॅकेटचा छडा लावताना पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. अजिंक्य राठोड आणि प्रशांत राठोड अशी गुन्हा दाखल झालेल्या कारागृह कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारागृहात कैद्यांना कोणत्याही सुविधा मिळत नसतात. मात्र नागपूर येथील कैद्यांना गांजा, दारू, मोबाईल, सीमकार्ड आणि अन्य वस्तू पुरविणारी टोळीच निर्माण झाली होती. या टोळीने प्रत्येक सुविधेसाठी वेगळा रेट ठरविला होता. दहा ग्रॅम गांज्यासाठी पाच हजार, फोनसाठी १०० रुपये प्रति मिनिट, सिगारेट व अन्य वस्तूंसाठी ५ ते १० हजार असे दर ठरले होते. हे साहित्य पुरविण्याचे काम हीच टोळी करत होती.
नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेले श्रीकांत थोरात, गोपाल पराते आणि राहुल मेंढेकर या तिघांनी कारागृहातून गांजा आणि काही अन्य वस्तूंची चिठ्ठी एका जेल पोलीस कर्मचारी प्रशांत राठोडकडे दिली होती. ती चिठ्ठी ‘व्हॉट्सॲप’वर कारागृहाबाहेर असलेल्या अजिंक्य राठोड नावाच्या कारागृह पोलीस कर्मचाऱ्याला देण्यात आली. ती चिठ्ठी थेट बाहेर असलेल्या पानवठ्यावर ठेवली जात होती. अशाप्रकारे गांजाची व्यवस्था करण्यात येत होती. त्यानंतर राठोड हा अन्य पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गांजा थेट कैद्यापर्यंत पोह करीत होता.
मंगळवारी या घटनेची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक तयार केले. सदर पथकाने कारागृहात ‘सर्च ऑपरेशन’ करून दोन्ही कारागृह पोलीस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून मोबाईल, सीमकार्ड आणि अन्य वस्तू जप्त केल्या.
दरम्यान, गेल्या महिन्यांत पोलिसांनी मध्यवर्ती कारागृहात छापा घालून ‘सर्च ऑपरेशन’ राबवले होते. मात्र, त्यावेळी या छाप्याची कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माहिती मिळाल्यामुळे काहीही आढळून आले नाही.