सासवड : पुणे शहर, जिल्ह्यातून २ वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या एका अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण ) शाखेच्या पोलिसांनी सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली आहे.
अतिश पांडुरंग दळवी (वय -२६, रा. जेजुरी नाका सासवड, ता. पुरंदर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर, व जिल्ह्यातून २ वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेला आरोपी आतिष दळवी हा तडीपार केले असुनही सासवड येथील त्याच्या घरी आला असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्याकडून मिळाली होती.
वरिष्ठांना सदरची माहिती देऊन त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली स्टाफ सह आम्ही दळवी आळी येथील गणपती मंदिराच्या समोरील बाजूस असलेल्या आतिश दळवी याचे राहत्या घराच्या बाहेर सापळा रचला. सदर ठिकाणी एक इसम मिळून आला त्यास स्टाफसह ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने वरीलप्रमाणे नाव सांगितले.
दरम्यान, दळवी याला जिल्ह्यातून व पुणे शहरातून आदेश बजावलेले तारखेपासून पुढील 2 वर्ष मुदतीसाठी हद्दपारचे आदेश झाले असताना तो सासवड शहर हद्दीत मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्यावर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पुढील कारवाई साठी सासवड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस हवालदार सचिन घाडगे, विजय कांचन, अजय घुले, अजित भुजबळ यांनी केली आहे.