लोणी काळभोर : कोलवडी-थेऊर येथील मुळा मुठा नदीच्या पुलावरून उडी मारून आज बुधवारी (ता.५) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीचे कोलवडी (ता. हवेली) येथील सागर भालसिंग या तरुणाच्या सतर्कतेमुळे प्राण वाचले आहे. लोणी कंद पोलिसांनी तरुणीला सुखरूप तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोलवडी-थेऊर येथील मुळा मुठा नदीच्या पुलाजवळ आज बुधवारी दुपारी साडे बारा ते दिड वाजण्याच्या सुमारास एक २५ वर्षीय तरुणी दुचाकीवरून आली होती. तिच्याजवळ एक मोबाईल फोनसुद्धा होता. तिने दुचाकी रस्त्याच्या बाजूला लावली. आणि नदीच्या पात्राजवळ फिरत होती. सदर तरुणी चिंताग्रस्त वाटत होती. आणि नदीच्या पात्रातील पाणी पाहून परत रोडच्या कडेला कोलवडी गावाकडे येत जात होती.
हि बाब लोणी कंद पोलिस ठाण्याचे पोलीस मित्र सागर भालसिंग यांच्या निदर्शनास आली. तेव्हा भालसिंग यांनी तरुणीला बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु ती बोलत नव्हती. व तेथे येण्याच थांबण्याच कारण देखील सांगत नव्हती. दरम्यान या काळात तरुणीला अचानक चक्कर आली. आणि तरुणी रस्त्यावर पडली. त्यानंतर सागर भालसिंग यांनी तरुणीला तत्काळ कोलवडी येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल केले. तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
दरम्यान, तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिला लोणी कंद पोलिसांनी केसनंद पोलिस चौकीत आणले. तेव्हा ती विमानगर येथील असल्याची माहिती मिळाली. आणि ती आत्महत्या करण्यासाठी आली असल्याचे स्पष्ठ झाले. त्यानंतर पोलिसांनी तरुणीचे मनपरिवर्तन करून तिला तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्त केले.
याबाबत बोलताना सागर भालसिंग म्हणाले कि, विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर माझ्याकडून एका आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या तरुणीचे प्राण वाचले आहे. यामुळे मला पोलीस मित्र म्हणून काम करण्यास अधिक प्रेरणा मिळेल. माझ्याकडून अशीच देशाची, राष्ट्राची व समाजाची सेवा घडो. अशी मी ईश्वराकडे प्राथर्ना करतो.
लोणी कंद पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे म्हणाले, मुलांनो नैराश्यातून आत्महत्येकडे वळू नका. जिवन हे अनमोल आहे. परिस्थितीला सामोरे जा. आणि जर काही अडचण येत असेल तर तुमच्या मदतीला महाराष्ट्र पोलीस सदैव २४ तास मदतीला तत्पर आहेत. तुम्ही फक्त एक कॉल करा तुमची अडचण नक्की सोडविली जाईल. रागाच्या भरात असे निर्णय घेऊ नका.