पुणे : शाळेतील अल्पवयीन मुलींना व्हॉटसअॅपवर ‘आय लव्ह यु’ असा मेसेज पाठवून त्यांचे जबरदस्तीने चुंबन घेणार्या शारीरीक शिक्षण शिक्षकाला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शाळेत ‘गुड टच, बॅड टच’ कार्यक्रमात हा प्रकार समोर आला.
अविशान गोविंद चिलवेरी (वय २३, रा. येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अविशान चिलवेरी हा गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून संबंधित शाळेत शारीरिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याने शाळेतील तीन अल्पवयीन मुलींना त्यांच्या व्हॉटसअॅपवर ‘आय लव्ह यु’ असा मेसेज पाठविला होता. त्या शाळेत असताना त्यांचे जबरदस्तीने चुंबन घेऊन त्यांना मिठी मारत विनयभंग केला होता.
दरम्यान, मंगळवारी (ता. २४) रोजी शाळेत ‘गुड टच, बॅड टच’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमादरम्यान मुलींनी समुपदेशक महिलेकडे आपल्यावरील प्रसंग सांगितला. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली.
त्यानुसार पोलिसांनी शिक्षकाला अटक केली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.