पुणे : पत्नीच्या प्रियकराला जीवे मारण्याची धमकी दिल्याने प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंतरवाडी (ता. हवेली) येथे गुरुवारी ता.२) घडली आहे. याप्रकरणी प्रेयसीसह तिच्या पतीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगेश सुरेश जाधव (वय – ३१ रा. मंतरवाडी मुळ रा. कल्याण जि. ठाणे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी मंगेशचे वडील सुरेश मारुती जाधव (वय-५३) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेसह तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मंगेश याचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती संबंधित महिलेच्या पतीला समजली होती.
त्यानंतर संबंधित महिलेच्या पतीने मंगेश याला फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली. व आरोपींनी मंगेशला वारंवार मानसिक त्रास दिला. आरोपींनी दिलेल्या मानसिक त्रासाला वैतागून मंगेशने मंतरवाडी येथील राहत्या घरात आत्महत्या केली.
दरम्यान, मंगेशचे वडील सुरेश जाधव यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधित महिला व तिच्या पतीविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन्ही आरोपींच्या विरोधात आयपीसी ३०६, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.