पुणे : पुण्याच्या औंध परिसरात श्वेता रानवडे या तरुणीने लग्नाला नकार दिल्याने प्रियकर प्रतीक ढमाले याने तिचा खून करुन स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी आरोपीविरोधात ठोस कारवाई न केल्याने संबंधित महिला पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित केले. तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक व आणखी एका पोलिस उपनिरीक्षकाची बदली करण्यात आली.
वैशाली सूळ असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, श्वेताने पुणे पोलिसांना हत्या होण्याच्या काही दिवस आधी पत्र लिहून आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते. मात्र पोलिसांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे श्वेताची निर्घृण हत्या झाली.
या प्रकणाची वेळीच दखल न घेतल्याने चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास निलंबित करण्यात आले. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली.
दरम्यान, श्वेताने पोलिसांना लिहिलेल्या पत्रात तिच्या जीवाला धोका असल्याचे म्हंटले होते. तसेच प्रियकर प्रतिक ढमालेवर तिने गंभीर आरोप देखील केले होते. तो तिचा छळ करत होता, तिला धमकवण्याचा प्रयत्न करत होता.
धमकीनंतर घरात घुसून राडा करेन, असे सांगत होता. त्याचा स्वभाव न पटल्यामुळे श्वेताने लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. नकारानंतर परिणाम भोगायला तयार रहा, अशी धमकीही दिली होती.
शिवाय तिच्यासोबत राहताना काढलेले फोटो, व्हिडीओंचा तो चुकीचा वापर करु शकतो, त्यामुळे त्याच्यावर योग्यवेळी कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार तिने पोलिसांना दीड महिन्यांपूर्वीच दिली होती. तिच्यावर संकट ओढावणार होते हे तिला कळले होते.
मात्र पोलिसांनी तिच्या तक्रारीची दखलच घेतली नाही त्यामुळे दोघांचा जीव गेला.