पुणे : पुण्यातील नवले ब्रिज अपघात करून फरार झालेल्या ट्रक चालकासह क्लीनरला सिंहगड रोड पोलिसांनी चाकण (ता. खेड) परिसरातील नानेकर वाडी येथून अटक केली आहे.
ट्रक चालक मनीराम छोटेलाल यादव (वय – २४ रा. ग्राम उमरिया, तहसील गुड, जिल्हा रिबा मध्यप्रदेश) व क्लीनर ललित यादव (वय २४, रा. ग्राम महूगंज जिल्हा रिबा मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुर मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून जाताना ट्रक चालकाने गाडीचे इंजिन रविवारी २० नोव्हेंबरला रात्री बंद केले होते. त्यामुळे त्या ट्रकचे ब्रेक्स लागले नाहीत. यामुळे तब्बल ४८ गाड्यांचा भीषण अपघात घडला होता. यामध्ये प्रवासी जखमी झाल्यानंतर चालक मणिराम यादवने ट्रक आहे त्या स्थितीत सोडून पोबारा केला होता.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना सिंहगड रोड पोलिसांना आरोपी चाकणमध्ये एका ट्रकच्या खाली लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली आहे.
दरम्यान, आरोपी मनीलाल यादव यांच्यावर सिंहगड पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान सहिंतेच्या कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ नुसार त्याच्यावर गुन्हा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.